पोलीस, महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 






अकोला, दि.७ (जिमाका)- ग्रामीण भागात कोरोनाचा  वाढता  प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे.  ग्रामस्तरीय समितीचा सहभाग घेऊन गावात निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेले पोलीस स्टेशन प्रभारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक, तहसिलदार ते मंडळ अधिकारी, तलाठी इ. सर्वांशी आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,  पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम,  उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी,  पोलीस स्टेशनचे प्रभारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये जा सुरु असते, त्यावर नियंत्रण आणावे असे निर्देश दिले.  तर पोलीस अधिकाऱ्यांनी अकारण फिरणारे,  दुकानांवर होणारी गर्दी, अकारण होणारी वाहतुक यावर नियंत्रण मिळवावे,असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. तर जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. आपापल्या कार्यक्षेत्रात होत असलेले विवाह समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेर गावी जाण्या येण्यासाठी सबळ (बहुदा वैद्यकीय ) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये. ज्या ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील चाचण्या वाढविल्या पाहिजेत. प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागात होत असलेला फैलाव आपण रोखू शकू,असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?